Monday 23 August 2021

डाॅ.अनंता कस्तुरे - सांकेतिक आणि गुप्त बोली (शोधनिबंध)

मराठीच्या सांकेतिक आणि गुप्त बोली


मानव हा समाजशील प्राणी आहे.तो समूहाने राहतो.जगातील प्रत्येक मानव हा समूहात राहताना ज्याप्रमाणे मनातील भावभावना,इच्छा - अपेक्षा व्यक्त करतो.,त्याप्रमाणे तो आपल्या वैयक्तिक गोष्टी,जात,धर्म,समूह,संप्रदाय व गट यांच्याही अनेक बाबी गुप्त ठेवत असतो.मानवाचा हा व्यक्त होण्याचा व गुप्त ठेवण्याचा स्वभाव वा प्रवृत्ती ही नैसर्गिक आहे.मानवाची ही विचारधारा प्रत्येक मानवात,समूहात,जाती - धर्मात व संप्रदायात आढळते.यामागे प्रत्येकाच्या श्रध्दा,व्यवसाय आणि धर्माचे तत्वज्ञान दडलेले असते.मानवाच्या खुल्यापणाने प्रकट होण्यातून जगात जशा विविध भाषा आणि बोलींची निर्मिती झाली.त्याप्रमाणेच मानवाच्या गुप्तता जपण्यातूनही अनेक सांकेतिक भाषा व गुप्त बोलींची निर्मिती झालेली आहे.प्रस्तुत लेखात मराठीच्या सांकेतिक भाषा व गुप्त बोली,त्यांचा अनुबंध,मराठीच्या गुप्त बोलींचे स्वरूप,समाजातील उपयोजन,गुप्त बोलीचे हेतू,इतिहास,वैशिष्टै,अभ्यास क्षेत्रे यांचा विचार करणार आहोत.

गुप्त शब्दाचे शब्दकोशात गुपित,अप्रकट,गूढ,सुप्त,छुपे,पडद्याआड,चोरटे,खासगी,गोपनिय असे अर्थ दिलेले आहेत.गुप्त बोलीस हिंदीमध्ये ' अंदर की बात ',बंगालीमध्ये ' संध्या भाषा ' तर इतर भाषेत कोड लॅग्वेज,मिताक्षरी,कोडवर्ड,मिरर लॅग्वेज असे संबोधले जाते.मराठी भाषेतील गुप्त बोलींच्या निर्मितीमागे व्यवसायातील तंत्रे इतरांना कळू नयेत,समूहातील सामर्थ्य व गोपनियता नष्ट होवू नये,धर्माचे तत्वज्ञान अबाधित रहावे,विरोधकांपासून संरक्षण व्हावे,व्यावसायायिक अर्थप्राप्ती,तत्वज्ञानाचा प्रसार,गुप्तता,प्रबळ श्रध्दा,धर्महित,कायदा प्रशासनापासून संरक्षण असे विविध प्रमुख हेतू असलेले दिसतात.

जगातील प्रत्येक भाषेला,बोलीला व त्यामधील साहित्याला स्वतःचा असा इतिहास असतो.त्यांची काळानुरूप चालत आलेली परंपरा असते.जगात आज 2786 बोली भाषा बोलल्या जातात.त्यापैकी भारतात 284 भाषा व 1652 बोली आहेत.या बोलींमध्ये गुप्त बोलींनाही विशेष महत्व आहे.जागतिक पातळीवर गाव,प्रांत,समूह,गट,संप्रदाय,धर्म आदींमध्ये गुप्त व सांकेतिक भाषा आहेत.या बोलींचे जागतिक स्तर,भारत देश,विविध संप्रदाय,धर्म,राजकर्ते व काळ यानुसार परंपरा व इतिहास सांगता येतो.तो इतिहास विविध ग्रंथ,पोथी,समूह,शिलालेखआदीमध्ये उपलब्ध आहे.प्रत्येक देशातील गुप्त बोलींचे स्वरूप,त्यातील शब्द,वाक्यरचना,सांकेतिक खाणाखुणा व चिन्हे ही वेगवेगळ्या पध्दतीची आहेत.चिन व जपानमध्ये ' चित्रलिपी' ही गुप्त भाषा उगम पावलेली दिसते.चित्रलिपी ही चिन व जपानमधील भाषेची जननी असून या भाषेतूनच तेथील इतर भाषा व बोली निर्माण झालेल्या आहेत.बायबल मध्ये 'यथश ' ही हिब्रु भाषेतील पध्दत गुप्त भाषायुक्त आहे.इजिप्तमध्ये चित्रलिपी ही गुप्त भाषा रुढ होती.भारतामध्ये सांकेतिक भाषा व गुप्त बोली या फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत.प्रत्येक समूहात स्वतःची अशी स्वतंत्र गुप्त भाषा प्रचलित होती.' कथासरित्सागर' ग्रंथात विविध सांकेतिक लिप्यांचे उल्लेख आढळतात.प्राचीन काळातील ताम्रपट,शिलालेख,शिल्पकला,हस्तलिखिते,विविध मुद्रावस्थातील आकृत्या,मूर्ती,गूढलिपी,किल्ले,किल्ल्यातील खजिना,गुप्त दरवाजे,ते उघडणारे रहस्यमय तंत्र,त्यांच्या विविध चाव्या व नकाशे,रस्ते,मुद्रा व अनेक रहस्यमय पडदे अशा अनेकांमध्ये गुपित सांकेतिक भाषा आढळते.भारतात महानुभाव,जैन,बौध्द,रामानुज इ.संप्रदायामध्येही गुप्त बोली व सांकेतिक भाषेची परंपरा आढळते.त्याबाबत अनेक पुरावे उपलब्ध आहेत.मराठी प्रांतातही विविध जाती - जमाती,संप्रदाय,व्यवसाय,धर्म,गट - तट इत्यादीनुसार गुप्त बोलीचे स्वरूप विविधांगी आढळते.मराठीच्या गुप्त बोलीत सांकेतिक चिन्हे,अंक,खाणाखुणा व चित्रे असे विविध संकेतही दिसून येतात.गुप्त बोली या समूहाप्रमाणेच राजदरबारी तसेच प्रत्येक राज्याच्या गुप्तचर संस्थांनी निर्माण केलेल्या दिसतात.इंग्रजांच्या गुप्तचर यंत्रणेत मेजर हडसन,मिर्झा इलाही बख्क्ष या गुप्तहेरांनी महत्वाची भूमिका पार पाडली.छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेरांची यंत्रणा स्वतंत्रपणे बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली राबवली होती.ईस्राईलची गुप्तचर संस्था मौसाद यासह जगातील अनेक गुप्तचर संस्थाच्या प्रशिक्षणात छ.शिवाजी महाराज व गुप्तहेर बर्हिजी नाईक यांची गुप्तनिती अभ्यासक्रमात शिकवली जाते.भारतातील क्तग्वेद,अर्थववेद,तैतिरिय संहिता,महाभारत आदी ग्रंथात गुप्तचर यंत्रणा,गुप्तहेर,हेरसंस्था यांचे संदर्भ आलेले आहेत.कौटिल्य यांनी कौटिलीयम् अर्थशास्रम् या ग्रंथात गुप्तहेरांचे नऊ प्रकार सांगितले आहेत.अभ्यासकांनी गुप्तचर संस्थांचे ह्युमन इंटेलिजन्स व टेक्निकल इंटेलिजन्स अशा दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे.याप्रमाणे गुप्त बोलींच्या इतिहासाला प्राचीन परंपरा असलेली दिसून येते.आजही या गुप्त बोली सर्वत्र प्रचलित आहेत.

प्रत्येक गुप्त बोली ही विशिष्ठ अशा सांकेतिक खाणाखुणा व संकेतांनी बनलेली असते.गुप्त बोलीचा सामाजिक व भाषिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी विशिष्ट संकेत,चिन्हे व खाणाखुणांची गरज असते.यावरून गुप्त बोली व सांकेतिक बोली यांच्यातील अनुबंध किती घट्ट व एकरूप आहे हे कळते. भारतातील सांकेतिक बोलीला वेगळी अशी परंपरा असलेली दिसते.पूर्वीच्या काळी अंक दर्शविण्यासाठी हातांच्या बोटांचा वापर केला जात असे.लेखनकलेचा शोध लागण्याअगोदर सांकेतिक भाषा दाखविण्यासाठी दृश चिन्हांचा वापर होतो.काही सांकेतिक शब्दासाठी मानवाचे अवयव, छंद, त्यातील चरणाची अक्षरे, देवता, गृह, नक्षत्र आदींचा वापर केलेला दिसतो. गावपातळीवर लहानपणी मुले जी 'च'कारी बोली वापरतात, ती सांकेतिक बोलीच होय. संगमेश्वरी ही व्यापारी लोकांची वाणी म्हणजेच भाषा आहे. आरवली गावातील व्यापारी लोक हे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व व्यापार करण्यासाठी संगमेश्वरी ही सांकेतिक भाषा वापरत. प्राचीन काळातील धार्मिक ग्रंथातही सांकेतिक बोलीचा वापर झालेला दिसतो. शतपथब्राह्मण, तैतिरीय ब्राह्मण या ग्रंथात चार संख्येसाठी कृत, चौवीस संख्येसाठी गायत्री, अठेचाळीस संख्येसाठी जगती याप्रमाणे सांकेतिक चिन्हाचा वापर केलेला दिसतो. इंग्रज सरकारने आदिवासींना जेव्हा गुन्हेगार म्हणून संबोधले तेव्हा पारधी, भिल्ल,

तडवी, पावरा, गौंड या सर्व जमातींनी स्वसंरक्षणार्थ आणि कायद्यापासून बचाव करण्यासाठी पारुषी ही गुप्त आणि सांकेतिक भाषा निर्माण केली. यामध्ये जा म्हणजे जास्मा, पळ-परमळ,भाकर- भारमाकर, ये- चेरमे, चाल-चारमाल, घोडा-घोरमोडा असे शब्दप्रयोग वापरले आणि सांकेतिक व गुप्त बोलीतून स्वतःचे संरक्षण केले.

मराठी समूहात वेगवेगळ्या दैवतांचे लोकउपासक आहेत. त्या त्या समूहात आणि

लोकउपासकांमध्ये सांकेतिक आणि गुप्त भाषा असलेली दिसते. गोंधळी समाजातील लोक हाताच्या खाणाखुणा करून एकमेकांकडे संदेश पोहचवितात आणि त्या माध्यमातून अर्थाजन करतात. गोंधळ्याची भाषा ही सांकेतिक भाषा आहे. पूर्वीच्या काळी ईजिप्त देशामध्येही चित्रलिपी प्रचलित होती. समाजात एखादी भाषा नष्ट झाली की त्या भाषा व समूहाबरोबर त्या परिसरातील आणि प्रांतातील संस्कृती, साहित्य, भौगोलिक-सामाजिक पर्यावरण आदीविषयक ज्ञानही नष्ट होत असते. हे सर्वकाही टिकविणे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे ठरते. अंदमान बेटावर जेव्हा त्सुनामी धडकली होती. त्यावेळी त्या बेटावरील एकही आदिवासी त्सुनामीचा बळी ठरला नाही किंवा आदिवासींचे फारसे काही नुकसानही झाले नाही. कारण त्या आदिवासींना समुद्रातील बदलत्या लाटा व बदलते पर्यावरण याविषयीचे ज्ञान अवगत होते. ते ज्ञान त्यांनी विशिष्ट सांकेतिक शब्दातून एकमेकांपर्यंत आणि समूहांपर्यंत पोहचविले. त्याबरोबर

जेव्हा त्सुनामी, भूकंप व इतर नैसर्गिक संकटे आली त्यावेळी आदिवासींनी सांकेतिक शब्द,

खाणाखुणातून ती माहिती इतरांना दिली आणि ते उंच टेकडीवर सुरक्षित ठिकाणी जावून थांबले.यावरून समाजव्यवहारात सांकेतिक आणि गुप्त भाषांचे असणारे महत्व अधोरेखित होते.तसेच समाजाचे व देशाचे रक्षण करण्याची क्षमता या सांकेतिक भाषेत आहे.,हेही स्पष्ट होते.आज सोशल मिडियावर Whatsapp,फेसबुक,ट्युटर आदीमध्ये चॅटिंग लॅग्वेज,शाॅर्टकट भाषा,टीनएज स्लॅग या भाषांचा वापर सातत्याने केला जात आहे.ही भाषा जो शिकतो त्याला भाषेतील सांकेतिक,गुप्त,शाॅर्टकट संकेत माहित असतात.त्याशिवाय ही भाषा कळणार नाही.कोणत्या शब्दासाठी कोणते अक्षर व अंक वापरायचे याची माहिती,ज्ञान प्रत्येकाला समजावून घेणे महत्वाचे ठरते.कमी शब्दात अधिक आशय देण्यासाठी तरूणांकडून चॅंटिंग लँग्वेजचा वापर केला जात आहे. समाजात सोशल मिडियाबरोबरच व्यवहारातील संभाषणातही ही चॅटिंगची भाषा वापरली जाते. या लँग्वेजचा प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार अर्थ लावताना दिसतो. सध्याच्या युगात अंकमिश्रीत भाषेचा वापर होतो आहे. ही सर्व प्रकारची भाषा सांकेतिक आणि गुप्त बोलीचे काळानुरूप बदलते रूप आहे, हे मान्य करावे लागते.बौद्ध धर्मामध्येही सांकेतिक भाषा होती. या धर्मामध्ये अनुयायांना विशिष्ट त-हेने काढलेली वर्तुळे, शरीरांच्या अवयवांचे हावभाव याद्वारे सांकेतिक व गुप्त भाषा शिकवली जात असे. ज्यांना या पंथाची दीक्षा मिळाली आहे. अशानांच या पंथाची सांकेतिक भाषा शिकवली जात असे. बौद्ध धर्माबरोबरच महानुभाव संप्रदाय, संत साहित्य आदीमध्येही ही सांकेतिक भाषा आढळते. यावरून सांकेतिक भाषेचे विविधांगी असलेले स्वरूप लक्षात येते.

सांकेतिक आणि गुप्त बोली या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. दोहोंच्यामध्ये

अन्योन्य संबंध असलेला दिसतो. सांकेतिक भाषेशिवाय कोणतीच गुप्त बोली निर्माण होऊ

शकत नाही. म्हणजेच सांकेतिक भाषा ही गुप्त बोलीची जनक भाषाच आहे. सांकेतिक भाषा व गुप्त बोली यांचे संदर्भ काळानुरूप बदलतात परंतु या भाषा कमी प्रमाणात नष्ट होतात. पण नष्ट होतानाच नवीन संदर्भ घेऊन नव्याने सांकेतिक भाषा आणि गुप्त बोलीचे महत्त्व अधोरेखित होते.एकंदरीत सांकेतिक भाषा आणि गुप्त बोली यांचा अनुबंध घट्ट असलेला दिसतो.दोन्ही भाषांचाचे अस्तित्व आजही मौखिक आणि लिखित स्वरूपात टिकून आहे. काळ बदलतो आहे तशी सांकेतिक भाषा आणि गुप्त बोलीही बदलताना पहावयास मिळते. या बदलत्या भाषा व बोलीचा काळानुरूप अभ्यास होणे आवश्यक आहे; तरच दोन्हीतील अनुबंध टिकेल असे

वाटते. गुप्त बोलीचा काळानुरूप अभ्यास होणे आवश्यक आहे; तरच दोन्हीतील अनुबंध टिकेल असे वाटते.


मराठी समूहात जेवढ्या बोली, जाती व संप्रदाय आहेत. त्या प्रत्येकाची स्वतंत्र अशी

एक गुप्त व सांकेतिक भाषा आढळते. गुप्त बोली ही व्यवसाय, संकटसमयी, तत्त्वज्ञानाचा प्रसार व धार्मिक विधी करताना वापरली जाते. ती मौखिक असते पण लिखित असतेच असे नाही. क्वचितच काही अभ्यासक व संस्था त्याची नोंद आपल्या दप्तरी ठेवताना पाहावयास मिळतात. गुप्त बोली फारसी लुप्त होत नाही कारण ती पारंपरिक आणि आधुनिक या दोहोंतील दुवा स्वीकारत, नवे शब्द-वाक्य-म्हणीचे संदर्भ घेत काळानुरूप बदल स्वीकारताना दिसते.गुप्त बोली ही त्या त्या समूहाने निर्माण केलेली असते. त्यामुळे त्या बोलीत त्या समूहातील भाषा, जात, धर्म, संप्रदायातील शब्द-वाक्यरचना समाविष्ठ केलेली असते. ही बोली त्या समूहाच्या व्यावहारिक बोलीपेक्षाही वेगळी असल्यामुळे ती अवघड व क्लिष्ठ आढळते.

त्यामुळे ती बोली इतरांना काय बोलली जाते आहे? संवादात काय चालले आहे? हे

सहजासहजी समजत नाही. त्या भाषेचा उलगडा त्या समूहातील व्यक्तीशिवाय भाषा तज्ज्ञानांही होत नाही. त्या गुप्त बोलीतील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यरचना याचे अर्थ कोणत्याच शब्दकोश आणि संदर्भ ग्रंथात सापडत नाहीत. गुप्तबोली ही त्या समूहाने स्वत:च्यासाठी तयार केलेली भाषा असते. त्यामुळे त्या बोलीत तिरकस शब्द, छोटी वाक्यरचना, यमकरहित जोडशब्द व अर्थहीन शब्द अनेक स्वरूपात आढळतात. यासर्वाचे ज्ञान आणि आकलन हे फक्त

त्याच समूहाला होताना दिसते.

गुप्त भाषा ही समूहानुसार, समूहातील गट व उपजातीनुसार बदलते. ही भाषा त्या

समूहातील स्त्री-पुरुष व लहान मुले या सर्वांनाच येते असे नाही. ज्याप्रमाणे आपणाला शाळेत मातृभाषेबरोबर हिंदी, इंग्रजी, संगणक, संस्कृत आदी भाषा शिकविल्या जातात. त्याचे ज्ञान प्रत्येकजण आत्मसात करीत असतो. त्याप्रमाणे त्या समूहातील इच्छुकांना त्या गुप्त भाषेतील शब्द, कोडे, वाक्ये, संदर्भ शिकावे लागतात. तसे व्यावहारिक संभाषण करून ती बोलीआत्मसात करावी लागते आणि मग ते समूहाच्या व्यवहारात सहभागी होताना दिसतात.प्रत्येक समूह हा व्यवहारासाठी बोली तयार करतो आणि तिचा वापर सातत्याने करतो. त्यामुळे ती समूहात बोली म्हणूनच रूढ राहत असते. त्या बोलीचे अस्तित्व कमी-जास्त प्रमाणात असू शकते. पण ती बोली असते हे मात्र निश्चित.

महाराष्टाृतील आदिवासी आणि भटक्या जाती-जमाती यांच्यामध्ये गुप्त बोली जास्त

प्रमाणात आढळून येतात. किंबहुना या समूहाची द्विभाषिक लोकसंस्कृती असलेली दिसते.द्विभाषिक लोकसंस्कृती म्हणजे त्यांची मातृभाषा ही एक की जी परंपरेने चालत आलेली असते आणि गुप्तभाषा दुसरी की जी समूहासाठी तयार केलेली असते. तडवी या समाजाची तडवी ही मातृभाषा आहे. तर जंगली ही गुप्त भाषा आहे. तसेच भिल्ल समाजाची भिलोरी ही मातृभाषा आहे तर पारसी ही गुप्त भाषा आहे. अशा अनेक जाती व जमातीमध्ये मातृभाषा आणि गुप्त भाषा या वेगवेगळ्या असलेल्या दिसतात.मातृभाषा आणि इतर भाषा बोलीप्रमाणे गुप्त भाषा ही व्यक्तीला सहजपणे शिकता येत नाही. कारण गुप्त भाषा शिकायची असेल तर त्या समूहांनी त्या व्यक्तीला त्या समूहामध्ये स्वीकारावयास हवे. त्या समूहाने त्या व्यक्तीला भाषा-बोली शिकवायचे ठरवले तरच त्या गुप्त बोलीतील अक्षर, अंक, सांकेतिक चिन्हे, खाणाखुणा या सांगितल्या जातील आणि शिकविल्या

जातील. शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली की मग त्या बोलीतील बारकावे, तिचे स्वरूप, गुप्तता व संदर्भ हळूहळू कळू लागतील. भाषाबोली शिकण्यासाठी तुम्हाला त्या समूहाने स्वीकारणे आणि भाषा-बोली शिकविणे महत्त्वाचे ठरते. ही बोली शिकण्यासाठी त्या समूहात मिसळणे व एकरूप होणे गरजेचे असते. त्या समूहाची संस्कृती, चालीरिती, परंपरा, नियम, श्रद्धा-अंधश्रद्धा,शिस्त आदीचे पालन करावे लागते. त्या समूहातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सोयी आणि वेळेनुसार त्या समूहात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागते. त्या बोलीतील बारकावे, शब्द-वाक्यांचे निरीक्षण करून प्रसंगी संभाषणात सहभाग घेऊन ती बोली आत्मसात करावी लागते. इतर भाषेप्रमाणे गुप्तबोलीला लिपी नसते. त्यामुळे तिथे अंकलिपी, बाराखडी किंवा त्या संदर्भातले

पुस्तकही उपलब्धही नसते. तसेच ती गुगल, संगणक आदी ठिकाणीही नेमकेपणाने उपलब्ध होत नाही. या सर्वांचा विचार करून प्रत्येकाला गुप्त भाषा ही स्व अनुभव ,निरीक्षण आणि सरावातून शिकावी लागते. यामुळे स्वत: सहभागी झाल्याशिवाय ही बोली शिकता येत नाही हे निश्चितआहे. ही भाषा-बोली शिकताना खूप कष्ट घ्यावे लागतात. मनात शिकण्याची उर्मी ठेवावी लागते. इथे आपल्या आवडी-निवडीला, छंदाला, समज-गैरसमजाला काही अर्थ नसतो. तो समूह जसा म्हणेल त्याप्रमाणे आपणास बदलावे लागते. त्यांच्याशी हितगुज साधतच शिकण्याचे पुढचे पाऊल टाकावे लागते. त्यांच्यातील श्रद्धा-अंधश्रद्धा व त्यांचे विशिष्ट मतप्रवाह यावर जास्तीचे भाष्य करून चालत नाही. त्यांना सुधारवण्याचा आणि त्यांच्यात लगेच बदल करण्याचा प्रयत्नही करता येत नाही. काही गोष्टी त्यांच्यादृष्टीने चूकीच्या वाटल्या की ते बोली शिकविणार नाहीत. त्यांच्या मनात आपल्याबद्दलचा संशय कायम राहत असतो. त्या मानसिक अवस्थेतच आपणाला शिकत राहवे लागते. दररोज मिळणाऱ्या शब्दांचा, वाक्याचा स्वत:चा असा शब्दकोष लिखित स्वरूपात तयार करावा लागतो. सराव करणे व समूहात मिसळणे हाच एकमेव मार्ग बोली शिकण्याचा असलेला दिसतो. कोणत्याही समूहाची बोली एकदा शिकली म्हणजे ती बोली कायमची शिकली किंवा बोलता आली असे होत नाही. कोणतीच गुप्त बोली ही कायमची नसते. तो समूह संरक्षणार्थ त्या बोलीत काळानुरूप बदल करीत असतो. त्यामुळे शिकलेली भाषा ही त्या काळापुरतीच मर्यादित असते. काळ बदलला की समूह त्या भाषेतील

बराचसा भाग नष्ट करतो आणि नवीन काळ, संदर्भानुसार नवीन भाषा तयार करतो. त्यामुळे प्रत्येक गाव,बोली शिकलेल्या व्यक्तीला पुन्हा त्या समूहात सहभागी होऊन बदलते संदर्भ, बदलती भाषा व शब्द शिकावे लागतात आणि त्यासाठी पुन्हा समूहात सहभागी व्हावे लागते.गुप्त भाषा या आजच्या काळात आधुनिक झाल्या आहेत. या भाषांनी नवीन तंत्रज्ञान आणि संदर्भ स्वीकारले आहेत. त्यामुळे ही भाषा व्यवसाय आणि प्रसार यानिमित्ताने सोशल मिडियावर शब्द, कोडे, खाणाखुणा, चिन्हे या स्वरूपात वापरली जात आहे. गुप्त बोली ही स्थानिक राहिलेली नाही. तिचे अस्तित्व हे विश्वपातळीवर दिसून येते. गुप्त बोलीचे विविध प्रकार हे समूह, गट, जाती-उपजाती यानुसार वेगवेगळे आहेत. असे असले तरी गुप्त बोली ही प्रांत व भागात बोलली जाते. पण ती कधीच एकसारखी असत नाही. विभिन्नता आणि प्रयोगशीलता हे तिचे वैशिष्ट्ये आहे. भारतातील गुप्त बोली विषयी डॉ. प्रभाकर मांडे यांनी नेमकेपणाने प्राचीन परंपरा सांगितली आहे, ते म्हणतात की, “भारतात धर्म, संप्रदाय,व्यवसाय अशा निरनिराळ्या आधारावर जे गट किंवा समूह निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये आपल्या धर्मविचारासंबंधी, तत्त्वज्ञानाविषयी किंवा व्यावसायिक विशेषांविषयी गुप्तता राखण्याची प्रवृत्ती दिसून येते. अशा प्रकारे गुप्तता राखण्याची परंपरा फार प्राचीन आहे" हे मांडे यांचे मत रास्त वाटते.

गुप्त बोली हा समूहाचा आविष्कार असतो. समूहामध्ये जे ठरलेले आहे, नियोजले आहे. त्याप्रमाणे ती बोली व्यक्त होत असते. गुप्त बोली ही सोन्याच्या खजिन्याप्रमाणे म्हणजेच 'म्हातारीची पिशवी' याप्रमाणे त्या त्या समूहात जपून ठेवली जाते. गुप्त बोलीबद्दल प्रत्येकाच्या मनात आकस आहे. त्या समूहात काहीतरी वेगळे चाललेले असते. असा समज-गैरसमज आहे.जोपर्यंत गुप्त भाषा या अनेक तयार झाल्या. पण त्या इतर समूहाच्या संपर्कात व्यवहारात आलेल्या दिसून येत नाहीत. त्या दुसऱ्या समूहाला शिकविल्या जात नाहीत. त्यामुळेच गुप्त भाषांचे आदिमपण आणि मूळपण आजही टिकून आहे.गुप्त बोली ही समूह, जात-गटानुसार जशी आढळून येते. बोलली जाते. त्याचप्रमाणे ती भाषा राजदरबारी तसेच गुप्तचर संस्थाच्यामध्येही बोलली जाते. आज जगातील प्रत्येक देशाने

गुप्तचर संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्या संस्थाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळवली जाते. भारताची-रॉ, इस्त्राईल-जाता मोसाद, सोव्हिएत रशिया- के. जी. पी,पाकिस्तान- आयएसआय अशा काही गुप्तचर संस्थांची नावे सांगता येतील. आज २१ व्या शतकात गुन्हेगारी व आतंकवादी हे देखील गुप्त भाषेचा वापर करीत असलेले दिसतात. त्यांची कोड लॅग्वेज ही फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित असते. त्यामुळे त्याचा उलगडा सहजासहजी दुसऱ्यांना होताना दिसत नाही.याप्रमाणे मराठी समूहातील जगभरातील तसेच भारतातील गुप्त भाषेचे स्वरूप विविधांगी आहे. प्रत्येक समूहानुसार प्रत्येक बोलीला वेगवेगळे पदर असलेले दिसतात. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत ही बोली चालत आलेली आहे. काळानुरूप तिच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. या बदलाचा विचार आणि संशोधन वेळोवेळी होणे आवश्यक वाटते.

महाराष्टाृसह जगभरात गुप्त बोली बोलणारे मराठी समूह आहेत.हे समूह जात,धर्म,संप्रदाय,व्यवसाय,लिंग,वय आदीनुसार निर्माण झालेले आहेत.भटक्या जाती,अनुसूचित जमाती,व्यावसायिक,सांप्रदायिक,गुप्तहेर,साहित्यिक,प्रशासकीय,शेतकरी व कामगार,ग्रामदैवतांचे भगत,लोकज्योतिशी अशा समूहाच्या विविध प्रकारानुसार गुप्त बोलीचे स्वरूप वेगवेगळे आढळते.महाराष्टाृत अंबुजी,चौरासी,वाघेरी,छप्परबंद,पारसी,डागुरी,बागवानी,करपल्लवी,साखित,च बोली,मिताक्षरी,कोडवर्ड,चित्रलिपी,अंकभाषा,मुखस्थविद्या,वाद्याची भाषा,आडबोली,सकळा,अंकपल्लवी,गुप्त लिलाव,देह गुप्त बोली,कोड लॅग्वेज,जंगली,जडभाषा,संगमेश्वरी,वडारी,चिडक,नंदभाषा,बोटंमोडी,टकारी अशा 30 प्रकारच्या गुप्त व सांकेतिक भाषा आढळतात.या प्रत्येक जाती जमातींच्या गुप्त बोलींचे समाज व्यवहारातील संपर्क प्रक्रिया व संप्रेषण व्यवहार विविधांगी आढळतो.

गुप्त बोली बोलणाऱ्या मराठी समूहामध्ये विमुक्त-भटक्या जाती-जमातींची

संख्या अधिक आहे. या समूहांनी आपले परंपरागत व्यवसाय जपत संरक्षण व गुप्ततेसाठी

आपल्या गुप्त बोली निर्माण केल्या. आज कमी प्रमाणात या बोली त्या त्या समूहात रूढ

असलेल्या दिसून येतात. कोल्हाटी, वैदू, गोपाळ, कैकाडी, रायरंद, डक्कलवार, शिकलगार,

रामोशी, डवरी आदी समूहाच्या गुप्त भाषेस पारसी असे म्हणतात. या सर्व समूहाची गुप्त भाषा'पारसी' असली तरी प्रत्येक समूहानुसार प्रत्येक जातीची शब्द, वाक्यरचना काही अपवाद वगळता वेगवेगळी असलेली दिसून येते. विमुक्त व भटक्या जाती समूहातील काही जातींची स्वतंत्र अशी गुप्त बोली आहे. नंदीवाले-नंदीवाले बोली, राजपूत भामटा-डागूर, टकारी भामटा टकारी, छप्परबंद-छप्परबंद गुप्त बोली, कटबू-चिडक, कंजारभाट-चौरासी या समूहांनी स्वतंत्र गुप्त बोली निर्माण केलेल्या आहेत. मांग समूहाची अंबुशी किंवा अबुजी गुप्त बोली ही वेगळी असलेली दिसते. मराठी समूहात अनेक भटक्या व विमुक्त जाती-जमाती आहेत की त्यांच्यामध्ये गुप्त बोली बोलल्या जातात. त्या आजही टिकून आहेत. परंतु येथे प्रातिनिधिक स्वरूपात काही जातींच्या गुप्त बोलींचा विचार केलेला आहे. सर्वच जातीतील गुप्त बोलींचा शोध घेणे आवश्यक व महत्त्वाचे ठरेल.

टकारी भामटा हा समूह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आढळून येतो. त्यांची 'टकारी' ही सांकेतिक व गुप्त भाषा आहे. या गुप्त भाषेत तेलगू आणि कन्नड भाषेतील शब्द आढळतात. पुणे, सातारा,सोलापूर, नाशिक व कोल्हापूर जिल्ह्यातील ठरावीक ग्रामीण भागात ही बोली बोलली जाते. या गुप्त बोलीत कट्टेड (पोलीस), वैचलू (रुपये), फडु इल्ल (तुरुंग), गोवड ( फौजदार), बचकू( दागिना), मूचड (चोर)असे शब्द आढळतात. छप्परबंद

या समूहाची लोकसंख्या खूपच कमी आहे. इंग्रजकाळात हा समूह नाणी तयार करून

व्यवहारात आणत. त्याकाळी इंग्रजांनी समूहाला गुन्हेगार ठरविले. ते स्वतःची अशी 'छप्परबंद'ही गुप्त बोली बोलतात. हा समूह जळगाव, होटगी, सोलापूर व मुंढवा येथे आढळतो. छप्परबंद गुप्त बोलीत कैकाडी, कंजारभाट समूहाच्या बोलीतील तसेच कन्नड भाषेतील बोण्णा ( सोने), कल्ल (दारू), कुत्ता खपराळ (शिपाई), चिबडा (कामगार),नावडी (पोलीस चौकी), दोक (घर), मंडळ (टोळी), टिपी (भाकर) याप्रमाणे शब्द येतात.

या गुप्त बोलीत तोब गया (पोलीसाच्या हातावर तुरी दिली), खांमुर लो खोटी नाणी करायला सुरुवात करणे) अशी वाक्यरचना आढळते.छप्परबंद समूह अल्पप्रमाणात असला तरी तो संघटीत आहे. नवीन व्यवसाय नोकरी व

शासकीय सुविधाच्या शोधात असलेला दिसतो.

कटबू हा समूह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळतो. विजापूर, कारवार व सोलापूर

परिसरात या समाजाचे वास्तव आहे. त्यांनी समूहांतर्गत व्यवहारासाठी 'चिडक' ही सांकेतिक बोली-भाषा निर्माण केली. या भाषेत कोकणी बोलीतील अनेक शब्द आहेत. काही शब्द डवरी समूहाच्या गुप्त बोलीतीलही दिसून येतात. उदाहरणार्थ, मन्याळ (पाणी), पनवा (पुरुष),ढोकळा (रुपया), झोरगोळ (मटण), पनवी (स्त्री) इत्यादी. कटबू समूहाची लोकसंख्या ठरावीक असल्यामुळे ही बोलीही कमी प्रमाणातच वापरली जाते.

कंजारभाट हा समूह महाराष्ट्रात गावोगावी जाऊन पाले ठोकून भटकंती करणारा समूह हा आहे. हा समूह दादागिरीने भिक्षा मागत असल्यामुळे लोकांच्या मनात या समूहाबाबत भितीचे वातावरण असते.पूर्वी या समूहातील स्त्रिया या गैरकृत्य करीत असत. आज कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे,संगमनेर, नंदुरबार, जळगाव आदी ठिकाणी रहिवासी झालेले दिसतात. हा समाज हिंदू धर्मीय आहोत असे सांगतात. त्यांची 'चौरासी' ही सांकेतिक व गुप्त भाषा आहे. या गुप्त बोलीत नांद (गाव), खावर (घर फोडी), नोकीदार (चौकीदार),

होडा (तुरुंग), न्हो (शंभर), रेढी (गाढव), बलवा (रूपया), लोड (बैल), चिमडी (तलवार),

थर (तीन), खतीस (तीस)असे शब्द दिसून येतात.

भटक्या जातीत मांग - अंबुजी,वडार - वड्डेरी,शिकलगार - जडभाषा,राजपूत भामटा - डागूर अशा गुप्त बोली वैशिष्ठपूर्ण आहेत.

जगभरातील मराठी समूहाचा विचार करता भटक्या जाती-जमातीबरोबरच आदिवासी जमाती ठिकठिकाणी आढळतात. महाराष्ट्राचा विचार करता तडवी, भिल्ल, अहिर, महादेव कोळी, वारली, ठाकर, कोरकू अशा अनेक जमाती जंगल व डोंगराच्या परिसरात राहतात.आदिवासी जमातीची संस्कृती, रूढी, परंपरा, भाषा व जीवनशैली ही वेगवेगळी असलेली दिसते. या जमाती जातनिष्ठ अशा गुप्त बोली बोलतात. या जमातींनी कायद्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी, समूहांतर्गत व्यवहारासाठी गुप्त बोली निर्माण केल्या. त्या आजही टिकून आहेत.मराठी भाषेत आदिवासीच्या प्रमुख भाषेप्रमाणेच गुप्त बोली-भाषाही महत्त्वपूर्ण आहेत. पारधी ही सातत्याने भटकंती करणारी आदिवासी जमात आहे. पूर्वीच्या काळी या समूहातील लोक शिकार व मासेमारी करून आपला उदर्निवाह करीत. पारध म्हणजे शिकार करणे यावरूनच जमातीस पारधी नाव पडले. भारतात महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात आदी

राज्यात ही जमात आढळते. फासेपारधी, हरण पारधी, मीर कोरचार व वाघरी अशा पोटजाती आहेत. त्यांची 'पारसी' ही गुप्त बोली आहे. काही उपजाती वाघेरी गुप्त बोली बोलतात. ही बोली पारधी, मारवाडी, गुजराथी व राजस्थानी मिश्रीत आहे. त्यांच्या भाषेत डोड्या (पोलीस पाटील), साटो (ऊस), वशाळी (चोरी), खपाई (शिपाई), बटलो

(पाखरू) असे शब्द

याचबरोबर खपाई आवास मूल (शिपाई येतो आहे पळ) अशी वाक्यरचनाही आढळते. पारधी हा समूह प्रदेशानुसार वेगवेगळ्या उपजातीमध्ये दिसतो. त्यांची गुप्त भाषा

ही वेगवेगळी आहे. आज हा समूह शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होत असला तरी नोकरी व शासनाच्या विविध सुविधांच्या विवंचनेत आहे. त्यांच्या गुप्त बोली आजही त्या त्या समूहात प्रचलित आहेत.पूर्वीच्या काळी गुन्हेगार म्हणून समजला जाणारा भिल्ल हा एक आदिवासी समूह आहे. त्यांनी

इंग्रजाविरोधात केलेले उठाव इतिहासात नोंद आहेत. भिल्लांनी स्वतःच्या संरक्षणासाठी व कायद्यापासून बचाव व्हावा या उद्देशाने स्वतःची पारसी ही गुप्त भाषा निर्माण केली. त्यांची व्यवहाराची भाषा 'भिलोरी' ही स्वतंत्र आहेच. पण गुप्ततेसाठी त्यांनी भिलोरी मिश्र अशी पारसी गुप्त भाषा तयार केली. या गुप्त भाषेत भिलोरीतील ह, व, र, म, हे वर्ण योजून व स्वरांचे

शब्दातील स्थान बदलून आणि कधी कधी नवे स्वर योजून गुप्त बोली बोलली जाते. या गुप्त बोलीतील शब्द जास्मा (जा), येरमे (ये), घोरमोड (घोडा), भारमाकर (भाकर), दूरमूध (दूध) याप्रमाणे दिसून येतात.भिल्लांच्या पारसीत परमिनी पी (पाणी पी), दारमारू पेरवानी का? (दारू प्यायाची का?), धरमरी

लिद्या (धरून नेले.) या प्रकारची वाक्यरचना आढळते.भिल्ल हा आदिवासी समूह असून त्यांची व्यवहाराची बोली भिल्लोरी आहे. तर

समूहांतर्गत पारसी ही गुप्त भाषा बोलली जाते. आज भिल्ल समूह शैक्षणिक सामाजिक दृष्टीने प्रगती करताना पहावयास मिळतो. त्यांची पारसी ही गुप्त बोली आजही समूहात प्रचलित आहे.तडवी हा आदिवासी जमातीचा समूह आहे. तो सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वास्तव्य करतो. तडवी हे स्वतःला भिल्ल समाजाचे वंशज मानतात. तडवी ही त्यांची मातृभाषा

आहे. तर 'जंगली' ही गुप्तभाषा आहे. हा समूह जंगली गुप्त भाषेस 'निसर्ग भाषा' असेही म्हणतो. या समूहाने जंगली गुप्त भाषेची निर्मिती ही निसर्गातील अनेक वस्तू, पशू, प्राणी, पक्षी,झाडे, पाने व इतर रोजच्या जीवनातील वस्तू, आवाज, नाद इत्यादीचा उपयोग करून केलेली आहे. हा समूह आपली संस्कृती, रूढी-परंपरा यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच परंपरेचे जतन

करण्यासाठी जंगली गुप्त बोलीचा वापर करतो.याप्रमाणे भिल्ल हा समूह जंगली ही गुप्त भाषा बोलतो. आजही हा समूह ही

भाषा जपताना दिसतो.अशा प्रकारे मराठी समूहामध्ये आदिवासी जमातीमध्ये गुप्त बोलींची परंपरा आढळते.महाराष्ट्रात भिल्ल, वारली, कोरकू, कातकरी, महादेव कोळी अशा अनेक आदिवासी जमातींचे समूह आहेत. प्रत्येकाची व्यवहाराची भाषा स्वतंत्र आहे. काही समूहात गुप्त भाषाही प्रचलित

आहेत.

सराफी बाजारातील नंद भाषेस 13 व्या शतकापासूनची परंपरा आहे.धनगर समाजाची शेळी मेंढी खरेदी विक्री करतानाची पारसी गुप्त बोली आजही प्रचलित आहे.कापड व्यावसायिक बागवानी गुप्त बोलीचा वापर करतात.जनावरी बाजारातील व्यापारी व दलालांची पारसी व गमज्यातील बोटेमोडी गुप्त बोली सर्वत्र दिसते.खाटिक ,हाॅटेल,मटका,जुगार - पत्ते या व्यावसायिकांची गुप्त बोली गाव,प्रदेश व समूहानुसार वेगवेगळी आढळते.

जगातील अनेक राज्यात, प्रांतातील विविध संप्रदायामध्ये गुप्त व सांकेतिक भाषा आहेत. बौद्ध, ख्रिचन, हिंदू, मुस्लीम, महानुभाव, रामानुज व जैन अशा प्रत्येक संप्रदायामध्ये गुप्त व सांकेतिक भाषा या प्राचीन कालखंडापासून चालत आलेल्या आहेत. आजही या विविध संप्रदायामध्ये काळानुरूप बदललेल्या गुप्त भाषा आढळतात. आपल्या संप्रदायांचे तत्त्वज्ञान व

अंतर्गत बाबी इतरांना कळू नये. गरजेवेळी संप्रदायातील अनुयायी यांनी संप्रदायाने तयार केलेल्या विशिष्ट गुप्त व सांकेतिक भाषेत बोलावे यासाठी प्रत्येक सांप्रदायिकांनी स्वतःच्या समूहासाठी

गुप्त भाषेची निर्मिती केली. काळानुरूप त्या भाषेत व संकेतामध्ये प्रत्येक संप्रदायांनी बदल केलेले दिसतात.बौद्ध धर्म संप्रदायामध्ये एक विशिष्ट अशी सांकेतिक भाषा वापरली जाते. ही गुप्त व सांकेतिक भाषा समजून घेतल्याशिवाय अनुयायी यांना बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व त्यातील आचार

संहिता कळत नसत. भारताचा विचार करता ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात बौद्ध धर्मात आपली गुप्तता ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेले दिसून येतात. या काळात गौतम बुद्धांचे निरोप हे विशिष्ट सांकेतिक भाषेत बदलत असत.

उदाहणार्थ, एखाद्या संदेशामधील सगळ्या स्वर व्यंजनामध्ये अदलाबदल केली जायची किंवा प्रत्येक शब्दामधील अक्षर उलट क्रमाने लिहिली जायची. लिहिलेला मजकूर समजू नये म्हणून तो वेगळ्याच कोनात म्हणजे तिरका व आडवा लिहिला जायचा.

कुमारिलभट्ट यांना बौद्ध धर्मामध्ये जाऊन त्यांचे संकेत व तत्त्वज्ञान शिकावे लागले.

याबाबत मा. शं मोरे यांनी मत व्यक्त केले आहे की, “ज्यांना पंथाची दिक्षा दिलेली आहे

त्यांनाच ही गुप्त बोली शिकवली जात.' बौद्ध धर्मामध्ये विशिष्ठ त-हेने काढलेली वर्तुळे

म्हणजे मुद्रा अशा स्वरूपाचे गुप्त अर्थ बोलीत असत. ठिकठिकाणची जी बौद्ध लेणी आहेत त्यामध्ये ब्राह्मी लिपीत शिलालेख उपलब्ध आहेत. त्यातही गुप्तता दिसते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून अनेक मराठीजन या धर्मात सहभागी झाले आहेत. यापूर्वी अनेक जण सहभागी होते पण प्रमाण कमी होते. जगभरातील मराठी समूह या धर्माचे अनुयायी असून ते बौद्ध धर्मातील गुप्त भाषेचा वापर करताना दिसतात.बौद्ध धर्मातील चर्च गीतांचे कवी व महामानव हे बौद्धाचे तांत्रिक व यौगिक संप्रदायातील

सिद्धाचार्य होते. त्यांच्या गीतांची भाषाही सांकेतिक होती. तिला 'संध्या भाषा' असे म्हणत तसेच काहीजण 'अंदर की बात' असेही म्हणतात.याप्रकारे बौद्ध धर्मात गुप्ततेची परंपरा चालत आलेली आहे.

बौद्ध धर्माप्रमाणे हिंदू धर्मामध्येही गुप्त व सांकेतिक भाषा आढळते. हिंदू धर्मामध्ये

मराठी समूहही सहभागी आहे. भारतात वैदिकांची एक संकेतभाषा असल्याचे महारूद्योपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांनी सांगितले आहे. महाभारत, रामायण, भगवत्गीता आदी धार्मिक ग्रंथामध्ये सांकेतिक भाषेचे उल्लेख आलेले आहेत. हिंदू धर्मात विविध जाती-जमाती यांचा

समावेश होतो. या सर्व जातीची स्वतंत्र अशी गुप्तभाषा आहे. ती सर्वत्र बोलली जाते.

महाराष्ट्रासह देशात जैन धर्माचे कार्य प्राचीन काळापासून आजपर्यंत सुरू आहे.

संप्रदायाचे अनुयायी अंतर्गत समूहामध्ये स्वतःची अशी गुप्त भाषा बोलतात. जैन संप्रदायात विविधांगी स्वरूपाचे साहित्य लेखनही झालेले आहे. त्यामध्येही गुप्त-सांकेतिक बोलीचा वापर

होत असे. उदाहरणार्थ, परमाणूला मुदगल म्हणायचे असा संकेत होता. घातीकर्म, अघातीकर्म, स्कंद,संस्कार, कंद, जीव, अजीव, संवर, निर्जर असे कितीतरी गुप्त संदेश जैन वाङ्मयात आढळतात.

जैन धर्मातील विविध प्रथांमध्येही गोपनियता ठेवली जाते. मृतप्रसंगी शोकप्रदर्शन करताना जैन समाजात गाणी म्हणण्याची प्रथा आहे. ही गाणी काही महिलानांच येतात आणि ती गाणी गुप्त ठेवतात.जैन धर्मात गुप्त बोली व सांकेतिक भाषा ही रूढ असल्याचे दिसून येते.

महानुभाव संप्रदायात व्यावहारिक बोलीबरोबरच गुप्त व सांकेतिक भाषेचा वापर केला जात होता. महानुभावाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी संप्रदायाचे जे तत्त्वज्ञान आणि विचारधन सांगितले होते. तेच अनुयायापर्यंत पोहचावे यासाठी या संप्रदायात विशिष्ट अशा लिप्या आणि

सांकेतिक भाषा निर्माण केलेल्या होत्या. संप्रदायात गोपनियता राहावी यासाठी नागरिक, सुंदर लिपी, पारपांडत्य लिपी, अंक लिपी, शून्य लिपी, सुभद्रा लिपी, श्री लिपी, व्रजलिपी, मनोहरा लिपी, कविश्वरी लिपी, सकळा अशा तीस लिप्या तयार केलेल्या होत्या. या सर्व लिप्यांना

गुप्ततेचे कवच होते. या संप्रदायात अक्षराऐवजी अंक वापरले जायचे. यातून अंकपल्लवी लिपीची निर्मिती झालेली दिसते.उदाहणार्थ, अ-२, ६-३, ४-४, क-६, ख-७, ६-२०, ५-२३, स-३१, १-३४, ज्ञ-३५

याप्रमाणे महानुभाव संप्रदाय हा मराठी भाषेच्या लेखन रचनेसाठी जसा महत्त्वाचा ठरतो.तसाच तो गुप्त व सांकेतिक भाषा आणि लिप्या निर्माण करण्यातही या संप्रदायाचे कार्य उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्र-गोवा राज्यातील अनेक मराठी समूहांनी ख्रिचन धर्म स्वीकारला. ख्रिचन

धर्मातही गुप्तता पाळली जात. सांकेतिक भाषेचा वापर होत असे. त्यांचा धर्मग्रंथ 'बायबल'मध्ये 'च' भाषेचा वापर झालेला आहे. हिब्रु भाषेतही गुप्त भाषेशी संबंधित अशी 'अथश' नावाची पद्धत रूढ होती. यामध्ये मूळ संदेशातले पहिले आणि शेवटचे अक्षर यांची अदलाबदल केली जायची. असेच उरलेल्या अक्षरांच्या बाबतीत करून त्यातून 'च' च्या भाषेतला संदेश तयार

केला जायचा.उदारणार्थ, आपणास खतरनाक' असा मूळ संदेश द्यावयाचा असेल तर 'अथश'मध्ये तो 'कनारतख' असा होईल.

ख्रिस्तपूर्व ६०५ मध्ये डॅनिएल यांनी भाषेविषयी मांडलेले मत विचारात घेतले तर

'बायबल या ग्रंथास आधारभूत मानून 'च' च्या म्हणजे गुप्त भाषेतला तो पहिला तज्ज्ञ मानला

जातो. साहित्य क्षेत्रातही 'च' भाषा आढळते. डॅन ब्राऊन यांनी 'द. दा. विंची कोंड' या

कादंबरीत येशू ख्रिस्ताच्या काळापासून ज्या रहस्यांचे जतन त्यांच्या घराण्याने केले होते. ते रहस्य यापुढेही अबाधित रहावे, दुसऱ्या कोणास ते कळू नये यासाठी 'ब्रदरहूड' स्थापन केली.त्यामार्फत सैनिक गट तयार करून गुप्त कागदपत्रे जमा करीत अशी माहिती आलेली आहे.ख्रिचन धर्मात 'प्रायरी ऑफ सायन' व 'ओपन देई' या गुप्त संघटना धर्मातील गुप्त रहस्याचे पिढ्यानपिढ्या जतन करण्याचे कार्य करीत आहेत.इस्लाम धर्मातही गुप्त व सांकेतिक भाषेचा वापर प्राचीन काळापासून चालत आलेला

आहे. इस्लामचा प्रसार करताना अनेक प्रकारच्या गुपितांसाठी गुप्त भाषेचा वापर केला जायचा.

यासाठी मूळ अक्षरांच्या ऐवजी दुसरी अक्षरे वापरली जात. या गुप्त भाषेत अक्षर वापरण्याऐवजी

#, !, / अशी चिन्हे वापरली जात असत. अरबांनी खूप मेहनत करून मोनोअल्फाबेरिक

सबस्टियूशन सायफर' या प्रकाराचे तंत्रज्ञान विकसित करून मूळ संदेश गुढ भाषेत ठेवण्यात

आले. यासाठी 'क्रिप्टोंनॉलिसिस' तंत्र नव्याने शोधले हे इस्लाम धर्मात गुप्त भाषेसाठी

महत्त्वाचे मानले जाते.

अशा प्रकारे मराठी समूह हे हिंदू, ख्रिचन, बौद्ध, इस्लाम व जैन धर्मामध्ये सहभागी

झालेला दिसतो. या समूहांनी प्रत्येक धर्माच्या तत्त्वज्ञान व आचार संहितेप्रमाणे गुप्त बोली-भाषेचे पालन केले. गुप्त भाषेत व्यवहार करीत. विविध संप्रदायाचे व धर्माचे तत्त्वज्ञान टिकविण्यासाठी मराठी समूहांनी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत.

महाराष्टाृबाहेरील इतर राज्यातील तसेच परदेशातील मराठीजण हे विविध गुप्त बोलींचा वापर करतात.मराठी भाषेतील साहित्यिकांनी कथा,कविता,कादंबरी,नाटक,आत्मकथन,डायरी व ग्रंथांमध्ये गुप्त व सांकेतिक भाषेचे वर्णन केलेले आहे.लहान मुले,स्रिया,गुन्हेगार,नक्षलवादी,आतंकवादी हे गुप्त बोलीचा वापर करतात.ग्रामदैवतांचे भगत हे विशिष्ठ अशी पारसी गुप्त बोलीचा वापर करतात.बिरोबाचे भगत 'हुईक',मेंढकी समूह 'ताडदेव भाडळी 'भवानीमातेचे गोंधळी ' गोंधळ',लक्ष्मीआईचे भगत 'नवस' अशा विधीवेळी आपापल्या गुप्त व सांकेतिक भाषेचा बोलत असतात.राघूवाले,कुडमोडी,पिंगळे,सहदेव,सटवाईवाले,डवरी,कापडी व मनेरी या सर्व जोशी समूहातील लोकज्योतिशी हे परंपरागत व्यवसायाच्यावेळी गुप्त बोली वापरतात.गणिती,वाद्यांची गुप्त व सांकेतिक भाषा सर्वत्र आढळते.सर्व गुप्त बोलीत काळानुरूप बदल झालेले आहेत.आज माहिती तंत्रज्ञान,सोशल मिडिया,संगणक,इंटरनेट यांचा वापर गुप्त बोलीसाठी होताना दिसतो.


प्रत्येक बोली भाषेला एक व्याकरण व्यवस्था आणि स्वतंत्र भाषिक व्यवस्था असते.गुप्त बोलीची वर्णमाला पुढीलप्रमाणे आढळते.स्वर: अ, आ, इ,ई,उ ऊ, ए, ऐ, ओ, औ, अॅ, ऑ, असे एकूण १२ स्वर,

स्वरादी: अं एक स्वरादी.व्यंजने क,ख,ग,

च,छ,ज,झ.,ट,ठ,ड,ढ,ण,

त.थ, द,ध,न ,प,फ,ब,भ,म,

अशी एकूण वर्गीय व्यंजने २३

य, र, ल, व्, श्, ष, स्, ह,ळ अशी इतर व्यंजने ९ आहेत.याप्रमाणे मराठी गुप्त बोलीत १२ स्वर, ०१ स्वरादी आणि ३२ व्यंजने अशी वर्णमाला आढळते.

मराठीच्या गुप्त बोलींचे डाॅ.प्रभाकर मांडे,डाॅ.गणेश देवी,डाॅ.अजीज तडवी,डाॅ.यु.म.पठाण अशा मोजक्याच अभ्यासकांनी संधोधन व लेखन केलेले आहे. मराठीच्या विविध

समूहातील ३०हून अधिक गुप्त बोली

या मौखिक स्वरूपात आहेत. तिचे संकलन, विश्लेषण आणि प्रकाशन करण्यासाठी शासन, संशोधन संस्था आदीनी आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे. भारतातील व महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, भटक्या जाती यांच्या गुप्त व सांकेतिक

भाषा आजही समाजात प्रचलित आहेत. शासनाने गुप्त भाषेच्या अभ्यासाला चालना

द्यावी व सर्वतोपरीने मदत करावी.

माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आतंकवादी, नक्षलवादी, गुन्हेगारी आदीजण हे गुन्हेगारीसाठी 'कोड लँग्वेज', गुप्त सांकेतिक बोलीचा वापर करीत आहेत. त्यांच्या गुप्त बोलींचे सर्वेक्षण करून तशी समाजात जनजागृती करण्यासाठी शासन, सामाजिक-संशोधन संस्था आदीनी सहभाग घेणे आवश्यक आहे.गुप्त बोलीच्या सर्वेक्षणासाठी विद्यापीठस्तरावर संशोधन प्रकल्प, एम. फिल, पीएच. डी.

साठी विषय देऊन स्वतंत्रपणे एका एका बोलीचा सखोल अभ्यास करण्यात यावा.

संशोधक, अभ्यासक व लेखकांना मराठी समूहाच्या गुप्त बोली, लोकसंस्कृती जतन

करणेसाठी प्रोत्साहित करावे.सर्व ग्रंथालयामध्ये गुप्त बोली विषयी पुस्तके, ग्रंथ उपलब्ध करून देणे आणि वाचकांची

अभिरूची वृद्धिगंत करणे महत्वाचे वाटते.

युनो/युनोस्को या जागतिक स्तरावरील भाषाभ्यासाच्या संघटनांनी मातृभाषा, बोली

यांच्या संशोधनाला महत्त्व व प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे सर्वत्र बोलींचे संशोधन सुरू

आहे. प्रस्तुत संशोधन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. गुप्त बोलीच्या अभ्यासामुळे मराठी समूहातील आंतरसंबंध, संस्कृती, मानव जातीचा इतिहास, गुप्त बोलींचे ज्ञान भांडार, बोलीतील साम्यभेद, रूढी-परंपरा आदी सर्वासाठी खुल्या होत आहेत. गुप्त बोलीतील प्रभाव, भाषामिश्रण, बोलीची नवनिर्मिती, साहित्यनिर्मिती आदी गुप्त

बोलीतील संशोधनाचे नवीन विषय उपलब्ध आहेत. हे विषय नवोदित संशोधकांसाठी

दिशा देतील. गुप्त बोलीचा स्वतंत्र शब्दकोश तयार करता येईल.मराठीच्या गुप्त बोली या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करून त्यातील शोधनिबंधाचे पुस्तक प्रकाशित करता येईल. भटक्या जाती आणि आदिवासी जमाती यांच्या गुप्त बोर्लीचे संशोधन करून व्याकरणरचना स्पष्ट करणे गरजेचे वाटते.




डाॅ.अनंता कस्तुरे

मराठी विभागप्रमुख,श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज,पाचगणी

मोबाईल - 9922866536,

Email - anantakasture213@gmail.com * "मराठी समूहातील गुप्त बोलींचा अभ्यास " या विषयावर पीएच.डी

पुरस्कार -

1- प्रतिभासंगम (कविता)- अ. भा.विद्यार्थी परिषद

2 - कोलमहर्षी (संशोधन)-कोळी जिल्हा समाज वि. म., कोल्हापूर

3 - 'शिविम्' - उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार २०१६-१७

4 - विशेष गौरव पुरस्कार,दे.भ.बळवंतराव मगर प्रतिष्ठान, निमगाव

5 - 'शिविम्' - उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार २०१८-१९

* दै. पुढारी, जनप्रवास, ललकार, अग्रदूत - बातमीदार व विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून काम.


  • लेखन -

* २५ शोधनिबंध प्रसिद्ध,

विविध साप्ताहिक, मासिक, वृत्तपत्रातून कविता, कथा, पुस्तक परीक्षण, लेख प्रसिद्ध